
पुणे, 18 नोव्हेंबर (हिं.स.)खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा खर्चात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात खतांच्या किमती ५० रुपयांपासून ते ४५० रुपयांपर्यंत प्रति ५० किलो पिशवीमागे दरवाढ झाली आहे. आणि पुढील काही दिवसात अजून खतांच्या किंमतीत वाढ होणार असून, ५० किलो पिशवीमागे ५० ते २०० रुपये पर्यंत ही वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. शेती पिकांना खताची मात्रा देणे आवश्यक असून तरकारी पिकांपासून तर नगदी पिके, ऊस आदी पिकांना खतांचा डोस देणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. परंतु अलीकडच्या काळात खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात खतांच्या किमती प्रति ५० किलो मागे ५० रुपयांपासून ४५० रुपये पर्यंत दर वाढ झाली आहे.यामध्ये १०:२६:२६ ही ५० किलोची पिशवी वर्षभरापूर्वी १४५० रुपयांना मिळत होती. ती मार्च २०२५ मध्ये १८५० वर गेली आणि आता त्याची किंमत १९०० रुपये आहे. तसेच २४:२४:०० ही बॅग वर्षभरापूर्वी १८५० रुपयांना होती ती आता १९०० रूपयावर पोहचली आहे. १५:१५:१५ ही ५० किलोची पिशवी १४५० रुपयांवरून १६५० वर पोहचली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु