
पुणे, 18 नोव्हेंबर, (हिं.स.)। बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांची निवड करताना अजित पवार यांनी नव्या जुन्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. परंपरागत विरोधकांचा विरोध संपविण्याचाही प्रयत्न करत बेरजेचे राजकारण करण्यासाठी दोन पावले मागे सरकण्याचाही निर्णय त्यांनी घेतला आहे.
या यादीमध्ये परंपरागत विरोधक असलेल्या सुनील सस्ते यांना राष्ट्रवादीतून तिकीट देण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. विष्णूपंत चौधर व जयसिंग देशमुख यांचाही विरोध निवडणूकीनंतर मावळला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनाही संधी मिळाली आहे.काही नव्या चेह-यांना संधी देत काही वजनदार कुटुंबात नवीन चेहरे त्यांनी दिले आहेत. माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांच्या भगिनी मंगला किर्वे यांना तर ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांचे बंधू जितेंद्र गुजर यांना संधी मिळाली आहे.राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असलेल्या सचिन सातव, जय पाटील, अभिजित जाधव, अमर धुमाळ, संजय संघवी, सविता जाधव, बिरजू मांढरे, नवनाथ बल्लाळ यांना पुन्हा संधी मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु