
पुणे, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६९ जागांसाठी एक डिसेंबर रोजी राज्यभरातील २० शहरात ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ४२ हजार उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता असल्याने बांधकाम, पथ, मलनिःसारण, पाणी पुरवठा, प्रकल्प आदी विभागातील कामांचा खोळंबा होत आहे. त्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीला प्राधान्य दिले जात आहे.
यापूर्वी महापालिकेत १३५ कनिष्ठ अभियंत्यांची भरती झाली आहे. त्यानंतर आता १६९ पदांची भरती करण्यासाठी अर्ज मागविले होते. पण प्रशासनाच्या संथ प्रक्रियेमुळे पावणे दोन वर्षापासून ही भरती प्रक्रिया रखडली आहे. आता महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेत ही भरती रखडू नये यासाठी वेगात प्रक्रिया सुरू केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु