

मुंबई, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। घाटकोपर मधील प्रसिद्ध दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या केव्हीके शाळेत विद्यार्थ्यांना कँटीन च्या खाण्यातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्यानंतर तब्बल 15 ते 16 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. उलट्या, मळमळ आणि पोटदुखीची तक्रार सुरू होताच विद्यार्थ्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
घाटकोपर पश्चिमेत असलेल्या या शाळेत इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी सकाळच्या सुट्टीत समोसा खाल्ल्यानंतर काही वेळातच त्यांची तब्येत बिघडू लागली. काही विद्यार्थ्यांना सतत उलट्या होऊ लागल्याने शिक्षकांनी तत्काळ परिस्थितीची दखल घेत महानगरपालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांना शाळेत बोलावले. काही पालकांनी आपल्या मुलांना थेट खाजगी रुग्णालयात दाखल केले.
शाळेच्या मुख्याध्यापिकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनाही समोसा खाताना कापराचा वास आल्याचे जाणवले होते. त्यामुळे त्यांनी तत्काळ कॅन्टीनमध्ये जाऊन समोसे देणे थांबवण्यास सांगितले. मात्र, त्याचवेळी विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने परिस्थितीची गंभीरता लक्षात आली. तपासात असे समोर आले की समोसा करताना कोणतीही शिळी भाजी वापरली नसून तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलात देवासमोर ठेवलेला कापूर चुकून पडला आणि त्याच तेलात समोसे तळले गेले.
राजावाडी रुग्णालयात दाखल झालेल्या पाच विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. इकरा जाफर नियाज सय्यद (११) आणि वैजा गुलाम हुसेन (१०) यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर राजीव खान (११), आरुष खान (११) आणि अफजल शेख (११) यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलात अनावधानाने कापूर पडल्याने ही संपूर्ण घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलीस, पालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.या प्रकरणी पोलिसांनी कँटीन चालक सुंदर देवाडिगा च्या विरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
दरम्यान, एन विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र हंगे यांनी सांगितले की तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून शाळांनी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. या घटनेनंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून शाळेच्या कॅन्टीनमधील स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule