
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष किंवा नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारा व्यक्ती हा थकबाकीदार नसावा, अशी अट आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी थकीत मालमत्ताकर भरणा केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आठवडाभरात नगरपालिकेच्या तिजोरीत तब्बल २४ लाख ६२ हजार ५२२ रुपये जमा झाले आहेत.
नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर एकूण ३७५ मालमत्ताधारकांकडून ही रक्कम गोळा झाली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे गेल्या काही वर्षांची मालमत्ता कराची थकबाकी वसूल होत आहे. पालिकेने यापूर्वी कर वसुलीसाठी अभियानही राबवले होते. परंतु याला नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. परंतु आता मात्र नागरिक स्वतःहूनच मालमत्ता कर भरायला पालिका कार्यालयात येत आहे. आठवडाभरात पालिकेच्या तिजोरीत बऱ्यापैकी धन लक्ष्मी जमा झाली आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत २३ लाख ८४ हजार ८५५ रुपये जमा झाले आहे. मालमत्ता करासोबतच संबंधित करदात्यांकडून नगरपालिकेला पाणीपट्टी कर, स्वच्छता कर, वृक्ष कर, शिक्षण कर यासाठीच्या रकमादेखील वसूल करण्यात आल्या. त्यामुळे निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांकडून सर्व प्रकारच्या करांचा भरणा झाला आहे.
दरम्यान मागील सात दिवसात जमा झालेल्या थकबाकीमध्ये मालमत्ता कराची रक्कम १३ लाख ६५ हजार २३१ रुपये असून नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाच्या करापोटी ५ लाख २० हजार ७१९ रुपये आहे. याशिवाय इपाणीपट्टीपोटी ५ लाख ७६ हजार ५७२ रुपये वसूल झाले. तर दुसरीकडे स्वच्छतेच्या दाखल्यापोटी जमा झालेली रक्कम ४५ हजार ९०० रुपये असून ज्या उमेदवारांनी ऑफलाइन फॉर्मची उचल केली, त्यांच्याकडून अर्जाच्या किमतीच्या स्वरूपात तीन हजार चारशे रुपये वेगळे जमा झाले आहेत,
आठवडाभराची मालमत्ता करवसुली
घर टॅक्स १३,६५, २३१
व्यापारी संकुलाची करपट्टी - ५,२०,७९९
पाणीपट्टी - ५,७६,५७२
स्वच्छता कर ४५,९००
ऑफलाईन अर्ज ३,४००
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी