
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.) : निवडणुका आल्या की नव नवीन किस्से बघायला मिळतात. काही ठिकाणी कुटुंबातच राजकीय चढाओढ पहायला मिळते. असेच एक उदाहरण बघायला मिळत आहे ते दर्यापूरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत. या शहरातील एका कुटुंबातील दोन भावांच्या पत्नी म्हणजेच जाऊ-जाऊ मध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. राजकारणाने नातेसंबंधांना निवडणुकीच्या आखाड्यात आणले आहे. दर्यापूरमध्ये भाजपचे अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत, तर काँग्रेसने प्रकाश भारसाकळेयांचे धाकटे बंधू सुधाकर भारसाकळेयांच्या पत्नी मंदाकिनी भारसाकळेयांना उमेदवारी दिली आहे. या दोन कुटुंबातील राजकीय स्पर्धा नवीन नाही. नऊ वर्षांपुर्वी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे नलिनी भारसाकळे आणि काँग्रेसतर्फे त्यांचेदीर सुधाकर भारसाकळे अशीलक्षवेधी लढत झाली होती. या निवडणुकीत नलिनी भारसाकळे यांनी सुधाकर भारसाकळेयांच्यावर ६६ मतांनी निसटता विजय मिळवला. त्यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी आपला गड शाबूत राखला होता. पण, आता या कुटुंबात दोन जावांमध्ये संघर्ष पहायला मिळत आहे. प्रकाश भारसाकळे यांचे बंधू सुधाकर भारसाकळे हे काँग्रेसचे नेते आहेत. ते अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत. प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी यांनी देखील राजकीय पक भुषवली आहेत. या दोन भावांच्या कुटुंबातील राजकीय संघर्ष यावेळीही लक्षवेधी ठरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी