अमरावती : तंत्रनिकेतन जवळचा कचरा डेपो हटवण्याची विद्यार्थ्यांची मागणी
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.) | शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळील कचरा डेपो हा परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठा त्रासदायक मुद्दा बनला आहे. महाविद्यालयाच्या भिंतीलगत मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात अस
तंत्रनिकेतनजवळचा कचरा डेपो हटवण्याची विद्यार्थ्यांची मागणी


अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.) | शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळील कचरा डेपो हा परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठा त्रासदायक मुद्दा बनला आहे. महाविद्यालयाच्या भिंतीलगत मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी, घाण, डास-माशांचा प्रादुर्भाव वाढत असून आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.

दररोज सकाळ-संध्याकाळ कचरा गाड्यांची सततची वर्दळ सुरू असल्याने परिसर दूषित वातावरणाने व्यापलेला असतो. या मुख्य रस्त्यावरून दरदिवशी शेकडो विद्यार्थ्यांची ये-जा होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. तसेच, मुख्य प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याचे ढीग, कुजलेली भाजीपाला, हॉटेलमधील उष्टा अन्नकचरा मिसळल्याने दुर्गंधीचा त्रास वाढत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

गाडगे नगर परिसरातील नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रारी दाखल करूनही कचरा डेपो हटविण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. शैक्षणिक संस्था आणि कचरा डेपो एकत्र राहू शकत नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि आरोग्य दोन्ही धोक्यात येत असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाला आवाहन केले आहे की, महाविद्यालय परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी कचरा डेपो तातडीने इतर ठिकाणी हलविण्यात यावा. वाढत्या समस्येमुळे हा मुद्दा आता तातडीच्या उपाययोजनेची मागणी करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande