
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.) | रायपूर चौऱ्यामल शेतशिवारात वाघाने एका रानडुकराची शिकार केल्याची घटना सोमवार, १७ नोव्हेंबरला उघडकीस आली होती. त्यावेळी उपस्थित मजुरांनी आरडाओरड केल्यामुळे वाघाने तेथून पळ काढला होता. विशेष म्हणजे वराहाचा अर्धवट सोडलेला मृतदेह सोमवारी मध्यरात्री १२ वाजता वाघाने पुन्हा पळवून नेला. हा प्रकार ट्रॅप कॅमेरात कैदा झाला आहे. त्यामुळे वाघडोह परिसरातील आसपासच्या जंगलातच वाघाचा मुक्काम असल्याचे दिसून आल्याने वन विभागाच्या टीमने वाघडोह गावात मुक्काम करून गावागावांत नाकाबंदी सुरू केली आहे.
वाघडोह गावाजवळ शेत शिवारात शेतात कपाशीच्या पिकाला पाणी देत असताना, रवी राजने या तरुणाला एक वाघ वराहाची शिकार जबड्यात धरून ओढत नेताना दिसला होता. रवी राजनेने आरडाओरड करताच वाघाने शिकार त्याच ठिकाणी टाकून रवी राजनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो पळून गेल्याने त्याचा जीव वाचला. या बाबतची माहिती सरपंचांचे पती संतोष लंगोटे व पोलीस पाटील सुभाष काकड यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाला वाघाच्या पायाचे ठसे असल्याचे दिसून आले.
त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी दोन ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यामध्ये सोमवारी रात्री वाघ हा अधर्वट सोडलेली शिकार घेऊन जात असताना दिसून आला. परिणामी, वाघडोह, जनुणा, डोलार, चौऱ्यामल, गोंडवाघोली, धाडी, खोडगांव या गावांतील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी व वन विभागाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेतट्रॅप कॅमेऱ्यात वाघ असल्याचे दिसून येत असल्याने पुढे वन्यजीव प्राण्यांसोबत मानवी संघर्ष होऊ नये, याकरिता नाकाबंदी व गावागावात मुनादी देऊन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी