
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.) अमरावती जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत तीन आमदारांचे निकटवर्तीय नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले आहेत. महायुतीमधील सर्व घटक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत, तर महाविकास आघाडी नऊ ठिकाणी एकमेकांविरोधात उभी ठाकली आहे. दर्यापूरमध्ये अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे, धामणगाव रेल्वे येथे भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे आणि अंजनगाव सुर्जी येथे शिवसेना (उबाठा) आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी मंगळवारी (१८ नोव्हेंबर) करण्यात आली. यावेळी अनेक अर्ज रद्द करण्यात आले. राजकीय पक्षांनी अनेकांना उमेदवारीचे आश्वासन दिले होते, परंतु ऐनवेळी केवळ एकाच उमेदवाराला 'एबी' फॉर्म दिल्याने, पक्षाच्या नावाचा उल्लेख असूनही 'एबी' फॉर्म जोडला नसल्यामुळे अनेक अर्ज बाद झाले.जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि २ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदासाठी एकूण १२७ जणांनी दावेदारी केली होती. तर, सर्व नगरपालिकांमधून निवडल्या जाणाऱ्या २७८ नगरसेवक पदांसाठी १,८२१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. सुरुवातीला महाविकास आघाडी आणि महायुती एकत्र लढण्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात महायुतीमधील प्रत्येक पक्ष सर्व ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीमध्ये तीन ठिकाणी समन्वय साधला गेला आहे. मोर्शी, वरुड आणि शेंदुरजनाघाट या तीन ठिकाणी त्यांनी युती कायम ठेवली आहे. मोर्शीत काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. शेंदुरजनाघाट येथे शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिले आहे, तर वरुडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला काँग्रेस आणि शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. उर्वरित नऊ ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. इतर ठिकाणांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला मदत करण्याचे ठरवले आहे. तसेच, १२ पैकी पाच ठिकाणी शिवसेनेने मैत्रीपूर्ण लढत कायम ठेवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी