
लातूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडावर सध्या लातूर शहरातील ढाबे असल्याचे दिसते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकांनी लातूर शहरातील पीव्हीआर चौक ते छत्रपती चौक जाणा-या रिंग रोडवरील अनेक ढाब्यांवर अचानक धाडी टाकल्या.
अनेकांनी जेवण व दारु टेबलवरच टाकून पोबारा केला, अशा परिस्थितीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ढाबा मालकासह २४ जणांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क लातूर यांचे नेतृत्वात अवैध ढाब्यांवर विनापरवाना मद्य सेवन करणा-या व्यक्तीवर तसेच ढाबाचालक व जागामालक यांच्यावर कारवाई करण्यात आली.
सदर कार्यवाहीमध्ये लातूर रिंगरोडवरील हॉटेल जगदंबा, हॉटेल निसर्ग, हॉटेल अनमोल, हॉटेल गाववाडा व इतर ढाब्यावर विनापरवाना मद्य सेवन करणा-या व्यक्तीवर व ढाबामालक यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ अन्वये कारवाई करण्यात आली.
मद्यपी व्यक्तीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ८४ अन्वये तर ढाबामालक यांच्यावर कलम ६८ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis