
अमरावती, 20 नोव्हेंबर (हिं.स.)राज्याच्या उच्च व तंत्र व शिक्षण विभागाने सेवाशर्ती कार्यक्रमांतर्गत शासकीय अकृषी विद्यापीठांमध्ये राबवलेल्या मूल्यांकनात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला ६३ गुणांसह तृतीय स्थान मिळाले आहे.
या यशाबद्दल विद्यापीठाच्या आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांचा कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सत्कार केला. कमी मनुष्यबळातही आपल्याला हे यश प्राप्त करता आले, हे अतिशय अभिमानास्पद असून, केलेल्या मूल्यांकनात आपले विद्यापीठ राज्यात तृतीय स्थान प्राप्त करु शकले, ते आस्थापना विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यामुळेच शक्य झाले आहे,’ असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
या मूल्यांकनात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली विद्यापीठाने ६८ गुणांकनासह प्रथम स्थान, तर मुंबई विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी ६६ गुणांसह द्वितीय स्थान पटकावले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील १३ सार्वजनिक अकृषी विद्यापीठांच्या कामकाजाची तपासणी केली. या उपक्रमात विभागाने विविध निकषांच्या आधारे विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले. या उपक्रमासाठी विद्यापीठाकडून कोणतेही अर्ज किंवा माहिती मागवले नाही. सरकारकडे सादर केलेल्या माहितीच्या आधारे २०२४- २५ या शैक्षणिक सत्रातील कामकाजाचे अन्स्र्ट अॅन्ड यंग कंपनीची मदत घेवून सदर मूल्यमापन केले गेले.कामकाजाचा आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम, सर्व संवर्गाची अद्ययावत ज्येष्ठता सूची, पदोन्नतीने नियुक्ती, सरळसेवा नियुक्ती, रिक्त पद स्थिती, बिंदू नामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, आय.जी.ओ.टी. पोर्टलवर नोंदणी आणि पाच अभ्यासक्रम पूर्ण करणे तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत व डिजिटल करणे असे निकष मूल्यांकनासाठी निश्चित करण्यात आले होते. या सर्व निकषांचे मिळून शंभर गुण ठेवण्यात आले होते.
या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, आस्थापना विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे, सहा. कुलसचिव अनिल मेश्राम, अधीक्षक अमोल म्हैसाळकर, वरिष्ठ सहाय्यक अजय देशमुख, डॉ. श्रीकांत तायडे, जगदीश देशपांडे, नरेंद्र खैरे, प्रदीप चिमोटे, प्रशांत देशमुख, आदिती मोहोड, अनंत पाटील, आशीष माहोरे, राम पासरे, संदीप ताथोडे, साहील क्षीरसागर, चंद्रकांत धंदर, दिनेश मारोडकर, रामेश्वर सोळंके, बिहारीलाल जयस्वाल, वंदना गुरनुले आदी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले,
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी