
अमरावती, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। एका दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार युवकांनी एका युवकावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. वर्चस्वाच्या भांडणातून ही हत्या झाल्याचे समजते. स्थानिक संविधान चौकात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. यश रवींद्र पाटणकर (वय २५, रा. विलासनगर) असे मृताचे नाव आहे. तर निखरे, खरे, बोबडे, यादव आणि मिरची अशी मारेकऱ्यांची नावे समोर आली असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत. बुधवारी सायंकाळी यश हा त्याच्या घरासमोरील गिट्टी बाजूला करीत होता. तेव्हा बुलटेवर तीन ते चार युवक आले आणि यशवर चाकूने सपासप वार करून लक्ष्मीनगरच्या दिशेने पसार झाले. घटनेनंतर शेजाऱ्यांनी तत्काळ यशला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.यशचा खून झाल्याची माहिती परिसरात पसरताच यशचे नातेवाईक व त्याच्या मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली. गाडगेनगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. पोलिसांनी याघटनेत हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी