
रायगड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकीचे मतदान दोन डिसेंबरला होणार असून संपूर्ण जिल्ह्यात प्रशासनाने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. निवडणूक सुरळीत, शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडावी यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा पूर्ण क्षमतेने मैदानात उतरली आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी लागणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण पूर्ण झाले असून सुमारे दोन हजारांहून अधिक कर्मचारी या निवडणुकीत तैनात होणार आहेत. मतदान केंद्रांची पाहणी, सुरक्षा व्यवस्थेची आखणी आणि मतपेट्या तसेच इतर साहित्याचे व्यवस्थापन या सर्व कामाला आता वेग आला आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, श्रीवर्धन, मुरूड-जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत आणि माथेरान या नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपदासाठी 34 आणि नगरसेवकपदासाठी 595 असे एकूण 629 उमेदवार रिंगणात आहेत. या दहा नगरपरिषदांमध्ये 107 प्रभाग असून नगराध्यक्षाच्या 10 तर नगरसेवकांच्या 217 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.प्रत्येक नगरपरिषदमध्ये उमेदवारांची संख्या मोठी असून खोपोलीमध्ये नगराध्यक्षपदासाठी सात आणि नगरसेवकपदासाठी तब्बल 118 उमेदवार आहेत. अलिबागमध्ये दोन नगराध्यक्ष आणि 42 नगरसेवक, श्रीवर्धनमध्ये चार नगराध्यक्ष आणि 60 नगरसेवक, तर मुरूडमध्ये तीन नगराध्यक्ष आणि 58 नगरसेवक पदांसाठी स्पर्धा रंगली आहे. पेणमध्ये एकूण 75, उरणमध्ये 53 आणि कर्जत, माथेरान येथे प्रत्येकी 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
प्रचाराची मुदत 30 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत असून सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. आरोप-प्रत्यारोप, आश्वासने आणि व्हिजनपत्रकांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची चढाओढ सुरू आहे.दरम्यान, दोन डिसेंबरला 308 मतदान केंद्रांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून दोन लाख 37 हजार 503 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तीन डिसेंबरला मतमोजणी होणार असून त्यासाठीही प्रशासन पूर्ण सज्ज आहे. शांतता, सुरक्षा आणि शिस्तबद्ध वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी पोलिस विभागाने विशेष पथके तयार केली असून सर्व संवेदनशील भागांवर लक्ष ठेवले जात आहे.रायगड जिल्ह्याच्या निवडणूक तयारीला आता अंतिम टप्पा आला असून प्रशासन निवडणूक सुरक्षितरित्या पार पाडण्यास कटिबद्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके