
अकोला, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेल्या २५ नोव्हेंबरची पुन्हा एकदा आठवण करून देत वंचित बहुजन आघाडीने “संविधान सम्मान महासभा” आयोजित करण्याची घोषणा केली आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शेवटचे भाषण भारतीय लोकशाहीचे मार्गदर्शक तत्त्व आहे. या भाषणात त्यांनी राष्ट्रापेक्षा धर्माला प्राधान्य देण्याच्या धोक्यांबाबत इशारा देत समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित सामाजिक लोकशाहीची आवश्यकता स्पष्ट केली होती.
या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संविधानाच्या गौरवार्थ “संविधान सम्मान महासभा” आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथे संध्याकाळी 4. वा. या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या महासभेत सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्ये आणि संविधान संरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संविधानप्रेमी नागरिक, फुले–शाहू–आंबेडकर विचारवंत, मानवतावादी आणि सर्व लोकशाहीवादी जनतेला या महासभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.देशभरातील मान्यवर या संविधान सम्मान महासभेला उपस्थित राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे