
जळगाव , 24 नोव्हेंबर (हिं.स.)जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी घराणेशाहीचा जोर दिसत असून अनेक नेत्यांनी आपल्याच घरात सत्ता ठेवण्यासाठी पत्नी किंवा घरातील सदस्यांना तिकीट दिले आहेत. घराणेशाहीवरुन माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरही जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी निशाणा साधला होता. आता एकनाथ खडसेंनी भाजपच्या दुहेरी भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.मंत्री गिरीश महाजन, सावकारे आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नींना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. साधना ताईंना बिनविरोध निवडून आणले ही घराणेशाही आहे का नाही? हे लोक माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करत होते पण आता यांच्या पत्नींना उमेदवारी मिळाली तर घराणेशाही नाही का? असा सवाल करत एकनाथ खडसेंनी हल्लाबोल केला.तुम्ही जे घडले ते माझ्यामुळे घडले असे चित्र आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांनी माझ्यावर नेहमी आरोप केला की मी घराणेशाही राबवतो. रक्षा खडसे-रोहिणी खडसे यांच्या राजकारणातील सहभागावरही त्यांनी माझ्यावर हे आरोप केले आहे. बरं झाले त्यांची पत्नी निवडून आल्यापासून त्यांना तोंड बंद झाले आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. सावकारे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली ते मंत्री आहेत तिकीट मंत्र्यांच्या बायकोला देण्यात आले आहे. आम्ही केली तर घराणेशाही आणि आता तुम्ही करता आहेत ते काय आहे असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे साधना ताईंना बिनविरोध निवडून आणले ही घराणेशाही आहे का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. भाजपचे मंगेश चव्हाण यांच्यासह पाचोऱ्याचे आमदार किशोर अप्पा यांनीही त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली मग ही घराणेशाही नाही का? असा सवाल खडसेंनी केला आहे.तुम्ही सर्वांनी इतके दिवस माझी टिंगल केली खरंतर माझी 40-50 वर्षांची मेहनत आहे. तुम्ही जे घडले ते माझ्यामुळे घडले असे चित्र आहे. माझ्यावर टीका करत असताना घराणेशाहीचा आरोप करत असताना आता तुम्ही कुठे गेले. महाभारतामध्ये एक म्हण आहे की तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म? असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर