
बीड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।नॅशनल अग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (नाफेड) च्या वतीने पाटोदा तालुक्यात हमी भावाने शेतमाल खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत.
तालुक्यातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी सोयाबीन हमीभावाप्रमाणे विक्री करण्यासाठी नाफेडच्या हमीभाव केंद्राकडे नोंदणी केली आहे. पाटोदा कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती किरण शिंदे यांच्या हस्ते मशीन, वजन काट्याचे पूजनकरुन खरेदीस प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी तालुक्यातील शेतकरी राजेंद्र काशीद, मुकुंद नागरगोजे यांच्या सोयाबीनला प्रथम विक्रीचा मान मिळाला. पाटोदा येथे हमीभावाने शेतमाल खरेदीस गती देण्यात आली आहे.
पाटोदा येथे सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार ३२५ रुपये, उडीद ७ हजार ८००, मुग ८ हजार ७६७ या प्रमाणे शासकीय दर जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान तालुक्यातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी सोयाबीन, १५० शेकऱ्यांनी उडीद, १४९ शेतकऱ्यांनी मुग विक्रीसाठी नोंदणी केली आहे. या हमीभावामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. तर शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेचा लाभ घेत शेतमाल विक्री करावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किरण शिंदे यांनी केले आहे.
तालुक्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने खरिप हंगामातील पीकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, उडीद आणि मुग, कापूस या महत्वपूर्ण पिकांना सर्वाधिक फटका बसला. यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धिर देत आमदार सुरेश धस यांनी हमीभावाचे दिलेले आश्वासन तालुक्यात नाफेडच्या माध्यमातुन हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करुन पूर्ण केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis