
रायगड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीत सरळ द्विपक्षीय लढत निश्चित झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या कविता ठाकूर यांनी अखेर माघार घेतल्याने शेतकरी कामगार पक्ष–कॉंग्रेस आघाडीच्या अक्षया नाईक आणि भाजप–शिवसेना युतीच्या तनुजा पेरेकर यांच्या दरम्यान थेट सामना रंगला आहे. पारंपरिकरीत्या शेकापचा बालेकिल्ला असलेल्या अलिबागमध्ये यंदाची निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे.
अलिबाग नगरपालिकेवर शेकापची सलग 40 वर्षांची सत्ता आहे. मागील निवडणुकीत प्रशांत नाईक यांनी थेट नगराध्यक्षपदावर मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. यावेळी त्यांच्या कन्या अक्षया नाईक या नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असून, शेकापकडून नवीन, सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांची मदार आहे. आघाडीकडून 18 तर काँग्रेसकडून 2 जागा लढवल्या जात आहेत.
दुसरीकडे भाजप–शिवसेना युतीकडून महत्त्वाचे चेहरे माघारी गेल्यानंतर तनुजा पेरेकर यांच्यावर अंतिम मुहर लागली. शिवसेनेतून भाजपत प्रवेश केलेल्या पेरेकर या नाराज गटातील महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. युतीकडून अनेक प्रभागांत उमेदवार शोधताना अडचणी आल्याचे दिसले. तरीही भाजपने विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देत तीन मुस्लिम उमेदवारांनाही संधी दिली आहे.शिवसेना (ठाकरे) गटानेही शेकापने जागा न दिल्याने दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान प्रभाग 2 (ब) मधून भाजप उमेदवार माघारी घेतल्याने शेकापचे प्रशांत नाईक बिनविरोध निवडून आले असून, याला शेकापमध्ये शुभशकुन मानले जात आहे.अलिबागच्या निवडणुकीत विकास हा मुख्य मुद्दा मानला जात आहे. भुयारी गटार, डंपिंग ग्राऊंड, वाहतूक कोंडी, भाजी मार्केट यासह स्मार्ट सिटीचा अजेंडा दोन्ही बाजूंनी मांडला जात आहे. प्रचाराला वेग आल्याने अलिबागकर आता आपल्या शहराचा कौल कुणाला देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके