
चंद्रपूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्हा महिला व बालविकास कार्यालय चंद्रपूर द्वारा 'बेटी बचाओ बेटी पढाओ' आणि बालविवाह जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विवाह करिता महत्वपूर्ण भूमिका बजावणारे मौलवी, पंडित, मंडप डेकोरेशनधारक, कॅटरिंग, कॅमेरामन आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
बालविवाह हा मुलींना पुढे जाण्यापासून वंचित ठेवतो. म्हणून प्रत्येक समाजातील मुलींनी शिक्षण घेतलेच पाहिजे. मी सुद्धा माझ्या मुलीला शिक्षण देत आहे. मुलामुलींनी आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवावी, असे प्रतिपादन मौलाना मजीद सदर जमीयत उलमा हिंद यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे म्हणाल्या, आजच्या तरुण पिढीने सोशल मीडियाचा वापर जपून करावा. स्वतःची सुरक्षा सर्वप्रथम स्वतः करावी. आवश्यक तेथे यंत्रणाचे सहकार्य घ्यावे, असे सांगितले. बालकल्याण समितीच्या अध्यक्ष क्षमा बासरकर यांनी, परिवार सक्षम असला आणि मुलांवर योग्य संस्कार घडले तर समाजात असे प्रकार होणार नाही. तसेच समाजाने सुद्धा एक जबाबदारी म्हणून घडत असलेल्या प्रकारांना प्रतिकार करणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांना रोज वेळ देणे गरजेचे आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन राणी खडसे यांनी तर आभार अभिषेक मोहुर्ले यांनी मानले. यावेळी बालकल्याण समितीच्या सदस्य वनिता घुमे, मनिषा नखाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी भोंवडे, नसीम शेख आदी मान्यवर यांच्यासह अधीक्षक हेमंत सवई, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अजय साखरकर कल्याणी रायपुरे, अभिषेक मोहर्ले तसेच यशोधरा बजाज फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव