संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेसची राज्यव्यापी ‘शिवशंभू स्वराज्य मोहीम’
मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.) - संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र, राज्यातील विविध संविधानवादी संघटना आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर
संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेसची राज्यव्यापी ‘शिवशंभू स्वराज्य मोहीम’


मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.) - संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र, राज्यातील विविध संविधानवादी संघटना आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली “शिवशंभू स्वराज्य मोहीम” राज्यभर राबवणार आहे.

दि. २५ – २६ नोव्हेंबर रोजी क्रांतीभूमी महाड – राष्ट्रमाता जिजाऊ समाधी स्थळ, किल्ले रायगड ही दोन दिवसीय मोहीम म्हणजे इतिहास, संविधान आणि सामाजिक न्याय यांच्या संगमाची एक अद्वितीय सामाजिक– राजकीय यात्रा आहे. महाडच्या क्रांती भूमीपासून रायगडाच्या स्वराज्यदुर्गापर्यंतचा हा प्रवास फक्त ऐतिहासिक स्थळांचा परिचय नाही तर आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत लोकशाही, संविधान आणि सामाजिक सौहार्दाचे रक्षण करण्याचा सामूहिक जनसंकल्प आहे. या कार्यक्रमाची मुख्य थीम ही संत विचार, स्वराज्य, संविधान म्हणजेच “भारत जोडो” यात्रेच्या राष्ट्रीय संदेशाची महाराष्ट्रातील पुढील निर्णायक पायरी आहे. द्वेष आणि ध्रुवीकरणाच्या भिंती पाडणे, प्रेम, बंधुता आणि सौहार्द बळकट करणे, संविधानिक मूल्यांचे संरक्षण, सर्व समाज घटकांना एकत्र आणून “संत–स्वराज्य–संविधान” ही त्रिसूत्री राज्यभर रोवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रात निर्माण झालेल्या जातीय– धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेली “सद्भावना यात्रा” ही सामाजिक ऐक्य व सर्वधर्मसमभाव पुनर्स्थापित करणारी ऐतिहासिक लोकयात्रा ठरली. या यात्रेतून जो सलोखा, बंधुता आणि संविधाननिष्ठ मूल्यांचा संदेश राज्यभर पसरला तेच विचार आता “शिवशंभू स्वराज्य मोहीम” अधिक व्यापक आणि ऐतिहासिक स्वरूपात पुढे नेत आहे. भारत जोडो यात्रा – सद्भावना यात्रा – शिवशंभू स्वराज्य मोहीम हे या तिन्ही यात्रांचा आत्मा एकच असून एकता, संविधान आणि स्वराज्य मूल्यांचे संरक्षण हे आहे आणि हीच भावना आज महाराष्ट्रात अधिक दृढ करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शिवशंभू स्वराज्य मोहीम म्हणजे स्वराज्य, संविधान आणि सद्भावना यांच्या त्रिसूत्रीवर उभा असलेला महाराष्ट्राचा सामूहिक संकल्प असून या संकल्पपूर्तीसाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande