अमरावती : “तिवसा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के
अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवनगाव परिसर पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही रात्री सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.समस्त गावकरी रात
“तिवसा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के : शिवनगाव दोन दिवसांत दोनदा हादरले, ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट”


अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवनगाव परिसर पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही रात्री सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.समस्त गावकरी रात्रभर रस्त्यावर बाहेरच थांबून होते. काल मध्यरात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास हे धक्के स्पष्टपणे जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अचानक घरं हलल्यासारखे जाणवताच नागरिक घाबरून बाहेर धावले. काही वेळ गावकरी रात्री रस्त्यावरच थांबून सुरक्षिततेची खात्री करत होते.शिवनगावात काही महिन्यांपूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते, तर जवळील शिरजगाव परिसरातही अशाच घटना पूर्वी घडल्या आहेत. पुन्हा सलग दोन दिवस धक्के जाणवल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थ प्रशासनाने या घटनांची गंभीर दखल घेण्याची मागणी करत आहेत.स्थानिकांच्या मते, रात्री उशिरा जाणवलेल्या धक्क्यांमुळे मुले, महिलांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून अनेकांनी घराबाहेरच वेळ घालवला. अद्याप प्रशासनाकडून अधिकृत तीव्रता किंवा केंद्रबिंदूची माहिती उपलब्ध नाही.ग्रामस्थांनी भूगर्भ विभाग व जिल्हा प्रशासनाने तात्काळ तपास करून नागरिकांना खात्रीशीर माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande