
बीड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
अतिवृष्टीमुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरत असतानाच रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यंदा खताच्या एका गोणीमागे तब्बल १५० ते २५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकरी चांगलेच आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
अतिवृष्टी व पुरामुळे जमिनी खरडून गेल्या. पिके वाहून गेली. अनेक शेतकरी अजूनही त्या नुकसानीतून सावरलेले नाहीत. त्यात आता खत दरवाढीमुळे शेती जमिनीत अजूनही पाणी साचलेले आहे. त्यामुळे शेतीची कामे रखडली आहेत. पेरणी उशिरा होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम रब्बी पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. शेतकरी वर्गात संताप आहे. खत दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी होत आहे. दरवर्षी नैसर्गिक आपत्ती, वाढता खर्च आणि कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या गळ्यापर्यंत बुडाला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतीचे नियोजन कोलमडल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis