
परभणी, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड परिक्षेत्राच्या ३० व्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने परभणी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस अधिकारी विरुद्ध पत्रकार असा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना खेळविण्यात आला. दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत सामना रंगतदार केला.
नाणेफेक जिंकत पोलिस अधिकारी संघाने प्रथम फलंदाजी स्विकारली. या संघात पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक गणेश कदम, महादेव मांजरमकर, सुरेश थोरात, दीपक दंतुलवार, महेश लांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले, अनिल कुरुंदकर, जीवन राजगुरू आणि विश्वजीत कासले यांनी सहभाग घेतला. पोलिस संघाने संयमी खेळ करत पत्रकारांसमोर धावांचे लक्ष्य ठेवले.
पत्रकार खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व कर्णधार राजन मंगरूळकर यांनी केले. संघात सुरज कदम, पंकज क्षीरसागर, धनाजी चव्हाण, प्रवीण चौधरी, नजीर खान, गणेश पांडे, विशाल माने, दिवाकर माने, मारुती जुमडे, संतोष मगर, अर्जुन जाधव आणि विशाल शिंदे यांचा समावेश होता.
सामन्याचे पंच म्हणून महेश पांगरकर आणि नवनाथ लोखंडे यांनी काम पाहिले. रणजीत आगळे, गणेश कोटकर आणि शेख मुबारक यांनी उत्साहवर्धक समालोचन करत सामन्याला अधिक रंगत आणली. यावेळी विष्णू सायगुंडे यांच्यासह छायाचित्रकार योगेश गौतम, उत्तम बोरसुरीकर उपस्थित होते. सामन्यापूर्वी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पत्रकार खेळाडूंचे स्वागत केले. त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि समालोचनातूनही सहभाग घेत सामन्यातील उत्साह दुणावला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis