
रायगड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (RJDCCB) सहकारी बँकिंग क्षेत्रातील आपली विश्वासार्ह ओळख अधिक दृढ करत व्यवसायाचा 7000 कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. राज्यातील नामांकित आणि वेगाने वाढणाऱ्या मध्यवर्ती बँकांमध्ये रायगड जिल्हा बँकेने आता अधिक ठोस स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे मार्च 2025 च्या तुलनेत बँकेच्या एकूण व्यवसायात तब्बल 1300 कोटींची वाढ नोंदली गेली असून, त्यामध्ये ठेवीत झालेली वाढ हा मुख्य घटक ठरला आहे.
बँकेने मागील सहामाहीत क्यूआर कोड, आयएमपीएस, युपीआयसारख्या आधुनिक डिजिटल सेवांचा विस्तार केल्याने सामान्य खातेदारांच्या बचत आणि चालू खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील विविध विश्वस्त संस्था, व्यापारी संघटना व सहकारी सोसायट्यांनीही बँकेच्या मुदतठेवींमध्ये वाढती गुंतवणूक केली आहे. “ही प्रगती म्हणजे संपूर्ण रायगडच्या विश्वासाची कमाई,” असे बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी सांगत ग्राहक व सभासदांचे विशेष आभार मानले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी डिजिटल सेवा विस्तार, तांत्रिक उन्नती आणि सायबर सुरक्षिततेमुळे व्यवहार वेगवान, सुरक्षित आणि सुलभ झाल्याचे सांगितले. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनी डिजिटल व्यवहारांचा वाढता स्वीकार हा बँकेच्या नैसर्गिक वाढीचा प्रमुख पैलू असल्याचे त्यांनी नमूद केले.
एनपीए नियंत्रण, कर्ज प्रक्रियेतील पारदर्शकता, तसेच संचालक मंडळाची सक्रिय देखरेख यामुळे बँकेवरील सार्वजनिक विश्वास अधिक बळकट झाला आहे. “आकडेवारीपेक्षा ग्राहककेंद्री सेवा हेच आमच्या वाढीचे खरे बळ असून, पुढील काळात तंत्रज्ञान, सेवा आणि वित्तीय शिस्त या तिन्ही आघाड्यांवर बँक अधिक सक्षमपणे कार्य करेल,” असे वर्तक यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके