
रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : रिंगणे (ता. लांजा) गावच्या पेडणेकरवाडीतील शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा येत्या २८ ते ३० नोव्हेंबर या काळात होणार आहे.
उत्सवात हिंदु परंपरेने चालत आलेले धार्मिक विधी आणि कीर्तन कार्यक्रम होणार आहेत. नावेरी नदीच्या काठावर वसलेले हे हनुमान मंदिर १९२७ साली उभारण्यात आले. सुरुवातीला हे मंदिर लाकूडकाम, दगडी मातीच्या भिंती अशा स्वरूपाचे होते. नंतरच्या काळात पायाला काळा दगड ,भिंतींना जांभा दगड वापरण्यात आला तरी सागवानी लाकडातून साधलेली आकर्षकता आणि मजबुती तशीच ठेवण्यात आली होती. शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या या मंदिराचा जीर्णोद्धार करताना कोकणाच्या पर्यावरणाशी मिळते जुळते घेणाऱ्या उतरत्या छपराचे आणि दीर्घकाळ टिकणारे लाकूड वापरताना त्यावर नक्षीकाम करून ते अधिक आकर्षक व टिकाऊ करण्याचा प्रयत्न केला आहे. हे मंदिर एक वेगळीच कलाकृती ठरली आहे.
हे मंदिर उभारले त्याच वर्षांपासून श्री हनुमान जयंती उत्सवाला सुरुवात झाली. रिंगणे गावात असलेल्या राम मंदिरातील श्रीराम नवमीच्या यात्रेपासून नाट्यपरंपरेला सुरुवात झाली. श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने परिसरातील लोकांना आणखी एक नाटक बघण्याची संधी मिळाली. तेथील रंगमंचावर सुरू झालेली नाट्य परंपरासुद्धा अव्याहतपणे सुरू आहे. इथे दर्जेदार नाटके सादर करण्याची परंपरा असल्याने इथे नाटक पाहायला आजच्या मोबाइलच्या जमान्यातही प्रेक्षक गर्दी करीत असतात.तीन दिवस चालणाऱ्या जीर्णोद्धार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या भाविकांसाठी चहापानापासून,नाश्ता व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी