
नाशिक, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। दोन वेळा विधानसभा निवडणुकीत तुम्ही जसा विश्वास दाखविला तसा विश्वास नगर परिषद निवडणुकीतही दाखवा तुमच्या शहरासोबत तालुकाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मनमाड नांदगाव शहरातील थेट नगराध्यक्ष योगेश पाटील व सागर हिरे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते यावेळी मंचावर विविध मान्यवर उपस्थित होते.
नांदगाव तालुक्याच्या गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासात सात नगरसेवक बिनविरोध निवडून आणून आमदार सुहास कांदे यांनी इतिहास घडविला असून जे शंभर वर्षात घडले नाही ते त्यांनी घडवून आणले,नांदगाव मतदार संघाचा बिग बॉस सुहास कांदे असून नाकाने सोलणारा कांदे नाही तर विकास कामाच्या माध्यमातून विरोधकांचे वांदे करणारा असल्याचे शिंदे म्हणाले.
नगर परिषदेच्या निवडणुकीत उभे असलेले मनमाड आणि नांदगावचे थेट नगराध्यक्ष व नगरसेवक व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील एकात्मता चौकात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मंचावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे,आमदार सुहास कांदे,अंजुमताई कांदे,माजी आमदार राजेंद्र देशमुख,संजय पवार,थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश पाटील,सागर हिरे,महायुतीचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना आमदार सुहास कांदे याने मनमाडसाठी दीड हजार तर मतदार संघासाठी साडे तीन हजार कोटीचा निधी आणून मनमाड,नांदगाव शहरासह संपूर्ण मतदार संघाचा विकास केला. सर्वात महत्वाचे मनमाड शहराचा पाणी प्रश्न कायम स्वरूपीं सुटला आहे. इतर विकास कामे देखील मोठ्या प्रमाणात झाली पुढे ही विकासाची ही गंगा अशीच सुरु राहील त्यासाठी तुम्ही मनमाड आणि नांदगावचे थेट नगराध्यक्ष सोबत महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन केले. यावेळी आमदार सुहास कांदे यांनी मनोगत व्यक्त करताना मनमाड शहरात भीम सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे भीमसृष्टी होणे अत्यंत गरजेचे आहे.
आम्ही वागदर्डिजवळ जागा निश्चित करून त्याचा प्रस्ताव पाठविला आहे. शिवाय येथे मुस्लीम बांधवांच्या इदगाहचा प्रश्न देखील प्रलंबित आहे. तो सोडविण्याची मागणी केली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या दोन्ही मागण्यासह इतर सर्व कामे केली जातील, विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही हा माझा शब्द आहे असे आश्वासन दिले.
नगराध्यक्ष झाल्यावर जनतेसाठी नगराध्यक्ष आपल्यादारी हा उपक्रम राबवून जनतेची सेवा करेल असे मनमाडसाठी थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश पाटील यांनी तर माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला आमदार सुहास कांदे यांनी ज्या विश्वासाने थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केला त्यांच्या आणि जनतेच्या विश्वासला कधी तडा जाऊ दिला जाणार नसल्याची ग्वाही नांदगावसाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी असलेले उमेदवार सागर हिरे यांनी दिली.
सभेत माजी आमदार राजेंद्र देशमुख,संजय पवार,अंजुमताई कांदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार अनिल आहेर यांचे चिरंजीव नांदगाव बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर यांनी त्यांच्या समर्थकासह शिवसेनेत प्रवेश केला. मंचावर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष फरहान खान, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे,राजेंद्र अहिरे,राजेंद्र पगारे,सरपंच राजेन्द्र पवार,अल्ताफ खान,राजेंद्र भाबड,योगेश इमले,असिफ शेख सुनील हंडागे आदीसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. संयोजन फरहान खान त्यांची टीम सोबत शिवसेना,भाजप,आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडुन आश्वासनाची खैरात...!
नांदगाव तालुक्यातील विकासासाठी आपण तब्बल साडेतीन हजार कोटी रुपये निधी दिला आहे आणि यापुढेही निधी कमी पडू देणार नाही असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिमसृष्टी असो वा ईदगाह मैदान या सर्वांसाठी तसेच इतर ड्रेनेज पाणी किंवा गार्डन यासह इतर सर्वच कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले आजच्या या सभेत एकनाथ शिंदे यांनी आश्वासनाची खैरात वाटली..
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV