
रायगड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। रोजगार हमी तथा फलोत्पादन खारभुमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या रायगड जिल्हा दौऱ्यादरम्यान दि. २४ नोव्हेंबर रोजी म्हसळा शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली . म्हसळा नगरपंचायतीच्या कामकाजासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष आढावा घेताना मंत्री गोगावले यांनी विकासाबाबत ठोस सूचना दिल्या. यावेळी शिवसेनेतर्फे मंत्री भरतशेठ यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात आले.
या बैठकीस जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, शिवसेना नेते रविंद्र लाड, श्रीवर्धन संपर्क प्रमुख सचिन पाटेकर, म्हसळा उपतालुका प्रमुख प्रविण बनकर, अमोल पेंढारी, जयेश जाधव, अरविंद शिंदे, मनोज निगुडकर, तळा तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, तळा शहर प्रमुख वडके, रितेश मुंडे, युवासेना जिल्हा प्रमुख बिपीन उभारे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना मंत्री गोगावले यांनी पक्षत्याग करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. “जे गेले ते मनाने आमचे कधीच नव्हते; निश्चल, निष्क्रिय लोक आमच्यापासून दूर जाणे हे अपेक्षितच होते,” असे स्पष्ट शब्दांत सांगताना, नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करून पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.श्रीवर्धन–म्हसळा परिसराच्या विकासासाठी मोठी पावले उचलली जाणार असून येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना प्रचंड ताकदीने उतरून विजय मिळवणार, असा ठाम निर्धार यावेळी भरतशेठ यांनी व्यक्त केला. “काही दिवसांत म्हसळा नगरपंचायतवर शिवसेनेचाच भगवा फडकणार,” असा जोरदार विश्वास त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
विरोधकांनी वर्षानुवर्षे केलेल्या मक्तेदारीच्या दाव्यांना म्हसळा तालुक्यातील शिवसैनिकांनी खिंडार पाडले असून आता सत्ता परिवर्तन अटळ असल्याचे त्यांनी नाव न घेता टोला हाणला. आगामी निवडणुकीत म्हसळा काबीज करणे हे शिवसेनेचे ठरलेले लक्ष्य असून नगरपंचायत आमचीच असेल, असा विश्वास जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनीही यावेळी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके