वैदर्भियांचा २९ नोव्हेंबरला खारघरमध्ये स्नेहमीलन सोहळा
* सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल नवी मुंबई, २४ नोव्हेंबर (हिं.स.) : नोकरी, व्यवसायानिमित्त आपापल्या गावांपासून शेकडो किलोमीटर दूर आलेल्या मुंबई व नवी मुंबईतील वैदर्भियांचा खारघर येथे आगामी शनिवारी २९ नोव्हेंबर रोजी चौथा स्नेहमीलन सोहळा आपला विदर्
वैदर्भियांचा २९ नोव्हेंबरला खारघरमध्ये स्नेहमीलन सोहळा


* सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

नवी मुंबई, २४ नोव्हेंबर (हिं.स.) : नोकरी, व्यवसायानिमित्त आपापल्या गावांपासून शेकडो किलोमीटर दूर आलेल्या मुंबई व नवी मुंबईतील वैदर्भियांचा खारघर येथे आगामी शनिवारी २९ नोव्हेंबर रोजी चौथा स्नेहमीलन सोहळा आपला विदर्भ सामाजिक व सांस्कृतिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला आहे.

खारघरच्या सेक्टर १२ येथे उत्कर्ष हॉल येथे २९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ ते रात्री १० दरम्यान हा स्नेहमीलन सोहळा पार पडणार आहे. चंद्रपूर, गडचिरोली ते बुलढाणा पर्यंत पसरलेल्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील हजारो वैदर्भीय नवी मुंबई व मुंबईत राहत आहेत. मात्र त्यांची प्रभावी संघटना नसल्याने वैदर्भियांचे सांस्कृतिक व इतर कार्यक्रम या परिसरात पार पडत नाही. त्यामुळे आपल्या गावांपासून खूप दूर आलेल्या मराठी माणसांना आपली बोली भाषा, आपल्या खाद्य व जीवनशैलींवर आधारित समारंभांची उणीव सतत भासत असते. ही उणीव दूर करण्यासाठी या परिसरातील वैदर्भियांनी एकत्र येऊन ‘आपला विदर्भ” ही संघटना तीन वर्षांपूर्वी स्थापन केली आहे.

गुणवंतांचा, कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार

या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, क्रीडापटू, आपली नोकरी आणि व्यवसायात कर्तुत्व गाजविलेल्या व्यक्तींचाही सत्कार करण्यात येणार आहे. तसेच नृत्य, गायन आदी कलाप्रकार सादरीकरणाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा परिचय करून देता यावा, यासाठी एक विशेष परिचय सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील लोकप्रिय सावजी भोजनाचीही खास व्यवस्था याप्रसंगी करण्यात आली आहे. या कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने वैदर्भियांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन आपला विदर्भ संस्थेचे अध्यक्ष एड. विजयकुमार कोहाड व सरचिटणीस प्रमोद चुंचूवार यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी- श्री.कोहाड-९९६९२३८१५० आणि श्री. राजेंद्र नंदनकर, सचिव- ९९६७२२३८९० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande