जळगाव : विद्यार्थ्यांच्या दुचाकीला बसची धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
जळगाव, 24 नोव्हेंबर (हिं.स.) चोपडा तालुक्यातील अकुलखेडा नजीक एक भीषण अपघात झाला. ट्युशनसाठी जात असताना दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या बसने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज २४ न
जळगाव : विद्यार्थ्यांच्या दुचाकीला बसची धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी


जळगाव, 24 नोव्हेंबर (हिं.स.) चोपडा तालुक्यातील अकुलखेडा नजीक एक भीषण अपघात झाला. ट्युशनसाठी जात असताना दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या बसने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज २४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता घडली.

जय प्रदीप महाजन (वय १५, रा. अकुलखेडा) असं अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अकुलखेडा (ता.चोपडा) येथील जय महाजन आणि त्याचा मित्र नील हर्षल पाटील हे दोघे दहावीचे शिक्षण घेत असून आज सोमवारी पहाटे दुचाकी क्र. (एमएच १९ एयु ३०५८) वरून चोपडा येथे ट्युशनसाठी जात होते. अकुलखेडा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर, समोरून चुकीच्या मार्गाने भरधाव वेगाने येणाऱ्या बस क्र. (एमएच १४ बीटी २०८३) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीस्वार दोघे गंभीर जखमी झाले.दोन्ही जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराला सुरुवात होण्यापूर्वीच जय महाजन याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नील पाटील याच्यावर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande