
परभणी, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।समाजात वाचन संस्कृती अधिकाधिक रुजावी, वाचनाच्या पुस्तकाच्या प्रथा परंपरा निर्माण व्हाव्यात या भावनेतून मुरलीधर शिराळ मांडाखळी यांनी आपल्या मुलाच्या लग्नात वाचन संस्कृतीचे कार्य करणाऱ्या अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्रासाठी अवांतर वाचनाची पुस्तके भेट दिली. विशेष म्हणजे पुस्तकांची ही भेट देऊनच दुसऱ्या क्षणाला पहिली मंगलाष्टका सुरू केली. जमलेल्या पाहुणे व मित्र परिवाराला पुस्तक व वाचन संस्कृतीला प्राधान्य द्यावे हा संदेश त्यांनी जाणीवपूर्वक या कृतीतून दिला. मिळालेली ही पुस्तकाची भेट जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावरगाव (ता.मानवत) या शाळेला दिली. शिरीष लोहट, बलभीम माथेले यांनी ही संकल्पना मांडून पूर्णत्वास नेली. यावेळी अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे प्रवर्तक विनोद शेंडगे, संतोष खामकर, मल्लिकार्जुन देवरे, मुरलीधर सिराळ ,उद्धव घाटूळ,विशाल कोल्हे, प्रा. टी. जी.सिराळ, परभणी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis