
पुणे, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यात महायुतीमधील खदखद वारंवार बाहेर पडत असताना स्थानिक पातळीवर मात्र सोईने महायुतीच्या घटक पक्षांकडून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांबरोबर युती करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी युती केली आहे. सदस्यपदाच्या २६ जागांपैकी एका जागेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवारी देण्यात आली आहे.दौंड नगरपालिकेच्या तीन वर्षांच्या विलंबाने होणार्या निवडणुकीसाठी जनतेतून थेट निवडून द्यावयाचे नगराध्यपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. तर १३ प्रभागातून २६ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व जागा लढवत आहे. राष्ट्रवादीने दोन जागा शिवसेनेला देऊ केल्या होत्या परंतु शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे एका जागेवर ऐनवेळी राष्ट्रवादीचाच उमेदवार उभा करावा लागला. राष्ट्रवादीने प्रभाग क्रमांक तीनमधून सर्वसाधारण महिला करिता राखीव जागेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार भाग्यश्री आनंद पळसे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख आनंद पळसे यांच्या भाग्यश्री पत्नी आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु