
पुणे, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटावर गंभीर असे आरोप केले आहेत. बारामती नगरपालिका निवडणुकीत बिनविरोधसाठी दबाव टाकला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. चार उमेदवारांना २० लाख रुपये देऊन फोडल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केलाय. लोकसभेला जे झालं ते विधानसभेलाही झालं आणि आता नगरपालिका निवडणुकीतही हेच होत असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय.बारामती नगरपालिका निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा प्रचाराचा शुभारंभ युगेंद्र पवार यांनी केला. यावेळी आपल्याविरोधात मोठी शक्ती असल्याचं म्हणत युगेंद्र पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचे ८ उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यापैकी चार ठिकाणी आमचे उमेदवार प्रत्येकी २० लाख देऊन फोडले आहेत.युगेंद्र पवार यांनी म्हटलं की, अजित पवार गटाचे ८ उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यापैकी ४ जागी आमचे उमेदवार होते, त्या चौघांना विरोधी गटानं प्रत्येकी २० लाख दिल्याची चर्चा लोकांमध्ये होतेय. आमचे उमेदवार सर्वसामान्य होते, पुढचे दहा वर्षे कष्ट करून त्यांना २० लाख कमावता येणार नाहीत. दोन उमेदवार नवेच आलेले होते. ते कुठल्याच पक्षात नव्हते. आम्हाला संधी दिल्यास चांगलं काम करू म्हणाले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवला पण ते फुटले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु