
पुणे, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात बिबट हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. पिंपरखेड येथे चिमुकल्यावर झालेल्या दुर्दैवी हल्ल्यानंतर काही ठिकाणी राजकीय हेतूने आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले. जनतेची दिशाभूल केली. सरकारने या प्रश्नाला अत्यंत गांभीर्याने घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत तातडीने आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मानव-बिबट संघर्षाबाबत राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपाययोजनांसाठी तातडीने १३ कोटी रुपये निधी वनखात्यासाठी मंजूर केला.” असे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.आदर्शगाव गावडेवाडी-अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे घोड वन विभागाच्या वतीने पाच कोटी ३४ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या वन उद्यानाचे भूमीपूजन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील होते. यावेळी देवेंद्र शहा, विष्णू हिंगे, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु