
सोलापूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत, इंधन बचत व्हावी, प्रदूषण होऊ नये, यासाठी प्रत्येक वाहनासाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले. मात्र, अजूनही टोल नाक्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळतात. सावळेश्वर टोल नाक्यावर दोन्ही बाजूंनी सायंकाळी सातच्या सुमारास साधारणत: अर्धा किलोमीटर वाहनांची रांग होती.सोलापूरहून पुण्याला जाताना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर येथे पहिलाच टोल नाका आहे. विजयपूरला जाण्यासाठी हत्तूर बायपास झाल्याने सोलापूर-पुणे महामार्गावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. या वाहनांच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचा टोल जमा होतो. फास्टॅग असलेल्या वाहनांना टोल नाक्यावर थांबायला लागू नये हा हेतू आहे. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी कर्मचारी टोल नाक्यावर असल्याने अजूनही त्याठिकाणी वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात. अनेकदा रुग्णवाहिकांसह अत्यावश्यक सेवेतील वाहनांना तेथील वाहनांच्या गर्दीचा त्रास सोसावा लागत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड