
सोलापूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
उजनी धरण सध्या १०० टक्के भरले आहे. यंदा शेतीसाठी तीन आवर्तने सोडली जाणार असून पहिले आवर्तन १५ जानेवारीपासून सोडण्याचे नियोजित आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक डिसेंबरअखेर नियोजित आहे. त्यात उन्हाळ्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन निश्चित होणार आहे.उजनी धरणावरील उजव्या व डाव्या कालव्यातून जिल्ह्यातील एक लाख ६३ हजार हेक्टर जमिनीला थेट पाणी मिळते. रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांखालील क्षेत्र वाढले आहे. सोलापूर जिल्ह्यातील साधारणतः: पाच लाख ३० हजार हेक्टर रब्बीचे क्षेत्र असून त्यात पावणेतीन लाखांपर्यंत ज्वारीचे क्षेत्र आहे. दुसरीकडे खरिपाचे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र आहे, पण लागवडीखालील क्षेत्र चार लाखांहून अधिक हेक्टर आहे.हंगामी बागायत क्षेत्रासाठी उजनीचा मोठा आधार आहे. आता शिरापूर, बार्शी, आष्टी, सांगोला, मंगळवेढा, एकरूख व लाकडी निंबोडी अशा नव्या उपसा सिंचन योजना आगामी एक-दोन वर्षात पूर्ण होतील. त्यातून आणखी एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने उजनी धरण अजूनही १०० टक्के भरलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा धरणातून तीनवेळा पाणी मिळणार आहे. त्यांना यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड