
कोल्हापूर, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। कोतोली ता. पन्हाळा गावातील एका घराच्या पहिल्या मजल्यावर गॅलरीत खेळत असलेले सव्वा वर्षाचे बालक तोल जाऊन खाली पडले. गटारावरील फरशीवर पडूनही किरकोळ दुखापत वगळता सुदैवाने कोणतीही मोठी इजा झाली नाही. दुर्घटना टळली आणि सुदैवाने बाळ बचावले.
कोतोली येथील प्रवीण पांडुरंग लव्हटे यांचा सव्वा वर्षाचा श्रीवंश हा मुलगा घराच्या गॅलरीत खेळत होता. लव्हटे यांची मुलगी कल्याणी गॅलरीत अभ्यास करत बसली होती आणि तिच्या शेजारी श्रीवंश खेळत होता. नजरेतून क्षणभर सुटलेले हे बाळ गॅलरी लगत ठेवलेल्या खुर्चीकडे गेले आणि त्यावर चढत असतानाच तोल जाऊन श्रीवंश खाली पडला. घराच्या आतून बाळ दिसेनासे होताच कल्याणी धावत बाहेर आली, तेवढ्यात तिला बाळ हवेतून खाली झेपावताना दिसले.
घाबरलेल्या आवाजात तिने आरडाओरडा केला. घराच्या खाली काही लोक बसले होते. कल्याणीच्या किंकाळीने ते तत्काळ बाहेर धावले. बाळ खाली पडताना पाहून दीपक परीट यांनी धाव घेऊन चपळाईने श्रीवंशला झेलण्याचा प्रयत्न केला. पण झेलही अपयशी ठरला. श्रीवंश खाली गटारावरील फरशीवर आदळला. मात्र डोक्यावर पडण्याऐवजी हातावर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.
दीपक परीट यांनी बाळाला उचलून घेतले. रुग्णालयात श्रीवंशचे एक्स-रे आणि स्कॅनिंगसह सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर बाळाची तब्येत चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या प्रसंगातून बाळ बचावले हे पाहून आई-वडिलांसह सर्व नातेवाईकांच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहील्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar