
अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। तिवसा तालुक्यातील मारडा ता. तिवसा येथील दिनेश रमेश हाडेकर (वय ४०) या युवकाने मूर्तिजापूर रोडवरील शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिनेश हाडेकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, लहान भाऊ, मुलगा, मुलगी असा मोठा आप्तपरिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश हाडेकर यांनी शेतात विहिरीजवळील हिवऱ्याच्या झाडाखाली विष प्राशन केल्यानंतर स्वतःच्या आईला फोन करून मी विष प्राशन केले अशी माहिती दिली. अचानक हे ऐकून आई सुन्न झाली. घाबरलेल्या आईने तात्काळ लहान मुलगा आणि दिनेशचा लहान भाऊ याला फोनद्वारे ही बाब सांगितली. आईकडून भावाला माहिती मिळताच भावाने तातडीने शेताकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दिनेशचा मृत्यू झाला होता.
ही घटना मौजा मूर्तिजापूर मार्गावरील एका शेतात घडली असून शेत आणि मारडा गावाचे अंतर जवळपास एक किलोमीटर आहे. घटनेची माहिती मिळताच कुऱ्हा पोलीस स्टेशन चे पथक घटनास्थळी दाखल झाले. कुऱ्हा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह तिवसा उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. कुटुंबावर शोककळा पसरली असून गावातही हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप तरी समजू शकले नसून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी