परभणी जिल्ह्यात “हमारा शौचालय, हमारा भविष्य” मोहिमेला वेग
परभणी, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। जागतिक शौचालय दिनानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परभणी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहीम 19 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून 10
जिल्ह्यात “हमारा शौचालय, हमारा भविष्य” मोहिमेला वेग — सीईओ रश्मी खांडेकर यांचे आवाहन


परभणी, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। जागतिक शौचालय दिनानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परभणी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहीम 19 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून 10 डिसेंबर 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती तसेच तालुकास्तरीय अधिकारी यांना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये वैयक्तिक व सामुदायिक शौचालयांची सर्वंकष तपासणी, दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे. दुरुस्तीची गरज असलेल्या सार्वजनिक शौचालयांची तात्काळ नोंद घेऊन कामे पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

शाळा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे, निवृत्त सैनिक, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातून स्वच्छता, सुरक्षित मलनिस्सारण, आरोग्य आणि हवामानपूरक स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. ग्रामस्थांना वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, सुशोभीकरण व नियमित देखभाल करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान विविध उपक्रम गावागावांत राबविण्यात येणार आहेत.

मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात उत्तम देखभाल व सुशोभीकरण करणाऱ्या वैयक्तिक तसेच सामुदायिक शौचालयांचा विशेष गौरव करण्यात येईल. 10 डिसेंबर रोजी मोहिमेचा समारोप करून ‘उत्कृष्ट शौचालय पुरस्कार’ जाहीर केले जाणार आहेत, अशी माहिती सीईओ रश्मी खांडेकर व स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत गाढे यांनी दिली आहे.

कोल्हावाडी येथे अभियानाचा शुभारंभ

मानवत तालुक्यातील कोल्हावाडी ग्रामपंचायतीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अप्पर आयुक्त सुषमा देसाई यांच्या हस्ते शौचालयाचे उद्‌घाटन करून “हमारा शौचालय, हमारा भविष्य” अभियानाचा शुभारंभ झाला.

यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत गाढे, गट विकास अधिकारी शिवाजी कांबळे, सरपंच जिजाबाई आठवे, विस्तार अधिकारी पंचायत कृष्णा कानडे, उपसरपंच विठ्ठल भिसे, ग्रामपंचायत अधिकारी मनीषा लोमटे आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande