
पुणे, 25 नोव्हेंबर (हिं.स.)राज्य परिवहन महामंडळाची आठ एकरपैकी चार एकर जागा ‘पीएमपी’ प्रशासनाला दिली जाणार आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे ‘पीएमपी’ने पाठविलेल्या प्रस्तावाला एसटी प्रशासनाने मान्यता दिली आहे. लवकरच एसटीची चार एकर जागा ‘पीएमपी’ प्रशासनाच्या ताब्यात येणार आहे. या जागेत मोठे आगार बांधणार आहे. सुमारे ८० बस येथे थांबू शकणार आहेत.
आळंदीत सध्या ‘पीएमपी’चे आगार नाही. आळंदीत दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी छोट्या जागेत बस थांबा बांधण्यात आला. या थांब्यावरून रोज सुमारे सव्वाशे बसची वाहतूक होते. आळंदीत दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने भाविकांच्या सोयीसाठी ‘पीएमपी’ प्रशासन गेल्या काही दिवसांपासून आगार बांधण्यासाठी जागेच्या शोधात होती. ‘पीएमपी’चे अध्यक्ष पंकज देवरे यांनी काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे जागा मिळण्यासाठी प्रस्ताव दिला होता. विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत हा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आला होता. त्याला आता एसटी प्रशासनाची मंजुरी मिळालेली आहे. पंकज देवरे यांनी सोमवारी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांची भेट घेतली. यावेळी कुसेकर यांनी एसटी प्रशासन ‘पीएमपी’ला जागा देत असल्याचे मान्य केले. येत्या काही दिवसांत तांत्रिक बाबी पूर्ण होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु