चंद्रपूर : कुष्ठरोग शोध मोहीम अभियानचा सीईओंकडून आढावा
चंद्रपूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरुग्ण शोध अभियान 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय
चंद्रपूर : कुष्ठरोग शोध मोहीम अभियानचा सीईओंकडून आढावा


चंद्रपूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरुग्ण शोध अभियान 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा पार पडली व आतापर्यंत झालेल्या मोहिमेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे इतर अधिकारी उपस्थित होते.

सदर मोहिमेत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाविषयी यावेळी माहिती देण्यात आली. यात मोहिमेचा उद्देश, समाजात लपुन राहिलेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर व विनाविकृती शोधून काढणे, त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे तसेच नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे व समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे. कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून सन 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे.

कुष्ठरोगाची लक्षणे : त्वचेवर फिकट/लालसर बधीर च‌ट्टा त्या ठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट/चकाकणारी त्वचा, त्वचेवर गांठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पुर्ण बंद करता न येणे, तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोटयापासून लुळा पडणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे,हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातुन वस्तु गळून पडणे इत्यादी

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत सर्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची कुष्ठरोग विषयक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तद्नंतर संशयित कुष्ठरुग्णांची तपासणी करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांचे मार्फत निदान करण्यात येणार आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत 6 लक्ष 12 हजार 63 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

सदर कार्यक्रम हा जनतेच्या हिताचा असून यामध्ये आरोग्य कर्मचा-यामार्फत घरोघरी जाऊन आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे. करीता सर्व जनतेने येणा-या कर्मचा-यांमार्फत आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौड़ा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह सर, प्रभारी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ, महादेव चिंचोळे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम यांनी केले आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande