
रत्नागिरी, 25 नोव्हेंबर, (हिं. स.) : बांगलादेशी घुसखोरांविरोधात जिल्हाधिकारी मनुज जिंदल कोंबिंग ऑपरेशनचे आदेश देणार आहेत. तसे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी हिंदु राष्ट्र समन्वय समितीला दिले आहेत.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून देशभरातील दहशतवादी कट, देशभरात सापडत असलेले स्फोटकांचे साठे, बनावट कागदपत्रांचा वापर, तसेच बांगलादेशी घुसखोरी या धोकादायक प्रवृत्तींना थोपवण्यासाठी तातडीने कारवाईची गरज असल्याचे हिंदु राष्ट्र समन्वय समितीने स्पष्ट केले. समितीच्या वतीने आज रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना या संदर्भात दोन महत्त्वाची निवेदने देण्यात आली. यावर श्री. जिंदल म्हणाले की, बांगलादेशी घुसखोरांविरोधात कोंबिंग ऑपरेशनचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले जातील. रेल्वेमधून येणाऱ्या संशयास्पद आणि अनोळखी व्यक्तींबाबत रेल्वे पोलिसांना तपास करायला सांगितले जाईल. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्याचेही श्री. जिंदल यांनी सांगितले.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बाँबस्फोटात उच्चशिक्षित धर्मांध डॉक्टरांचा सहभाग आढळून आला आहे. दहशतवाद्यांचा अयोध्येतील श्रीराम मंदिर, मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर येथे ६ डिसेंबर रोजी मोठा बाँबस्फोट घडवून आणण्याचा कट होता. अशा प्रकारे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रे, मंदिरे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. देशभरात राष्ट्रीय तपास संस्था आणि स्थानिक पोलिसांनी जवळपास २,९०० किलो स्फोटके जप्त केली आहेत. गुजरात आतंकवादविरोधी पथकाने नवी दिल्ली, लखनौ आणि अहमदाबाद येथील हिंदूंच्या प्रमुख मंदिरांमध्ये भक्तांना प्रसादाच्या माध्यमांतून विष देण्याचा मोठा कट उघड केला आहे. बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आणि जन्मदाखले मिळवून रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोर भारतीय नागरिक म्हणून वावरत आहेत. देशातील अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला गंभीर धोका लक्षात घेऊन देशभरात विशेषतः संवेदनशील परिसरात व्यापक शोधमोहीम घेऊन दोषींवर, तसेच बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. दहशतवादी कारवायांशी संबंध असणाऱ्या शिक्षण संस्थांची मान्यता रद्द करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. विशेष म्हणजे यापैकी काही जण कोणत्याही कागदपत्रांशिवाय, तर काही जण बनावट कागदपत्रांसह अनेक वर्षे जिल्ह्यात राहत असल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. रेल्वेमधून अनोळखी व्यक्ती रत्नागिरीत प्रवेश करत असल्याची, रत्नागिरी औद्योगिक क्षेत्र परिसरातील रिकामे प्लॉट, रिकाम्या इमारती, बेघरांसाठी आरक्षित असलेले भूखंड इत्यादी ठिकाणी वास्तव्य करत असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. फळ रस विक्री, भंगार व्यवसाय, बेकरी व्यवसाय, बांधकाम क्षेत्र, मासेमारी क्षेत्र, झोपडपट्ट्या यांमध्ये बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे. अशा सर्वांची ओळख परेड तपासणी पोलीस आणि प्रशासनाने तातडीने करावी. रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम राबवावी; बनावट ओळखपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटची पाळेमुळे उखडून त्यावर कठोर कारवाई करावी; घुसखोरांना आश्रय देणारे, जामीन देणारे किंवा कोणत्याही प्रकारचे साहाय्य करणारे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करून त्यांना देशाबाहेर हाकलून द्यावे, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने देण्यात आलेल्या दुसऱ्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देताना कुवारबाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश तोडणकर, कार्याध्यक्ष हितेंद्र पटेल, सचिव प्रभाकर खानविलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विजय सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते संदीप सुर्वे, दीपक गावडे, शैलेश बेर्डे, संकेत कदम, अमितराज खटावकर, आदेश धुमक, उत्कर्ष कळंबटे, मांगीलाल माळी, मुकेश माळी, हिंदु जनजागृती समितीचे विष्णू बगाडे, गोविंद भारद्वाज, संजय जोशी आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी