
बीड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी, त्यांच्या वेदना, त्यांच्या प्रश्नांची खरी जाण असणारे लोकच शहराचा कायापालट करू शकतात. आणि म्हणूनच आपण ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर बीडच्या विकासासाठी लढतोय, अशा भावना बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या निमित्तानं पार पडलेल्या प्रचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीड येथे जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की,
यावेळी लोकविकास महाआघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती प्रेमलता दादासाहेब पारवे यांना बहुमतानं विजय करा, असं आवाहन केलं. श्रीमती प्रेमलताताई यांनी नायब तहसीलदार म्हणून काम केलं आहे. चांगली प्रशासकीय समज, लोकांशी जवळीक आणि स्थानिक समस्यांकडे पाहण्याची योग्य दृष्टी ही त्यांची मोठी ताकद आहे. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या नवीन सहकार्यांचं मनापासून स्वागत केलं, त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मराठवाडा साधू-संतांची भूमी आहे. विविध जाती-धर्माची लोकं इथं एकत्र राहतात. सर्व समाजघटकांना, सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन विकास साधायचा, हीच आमची भूमिका आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनं प्रेरित होऊन आम्ही कामं करत आलो आहोत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘रयतेचं राज्य’ स्थापन केलं, त्याच तत्वावर आम्हाला काम करायचं आहे. बीड शहर हे जिल्ह्याचं मुख्यालय असताना देखील अनेक वर्ष विकासाच्या बाबतीत मागे राहिलं. आरोग्य सुविधा जशा हव्यात तशा नाहीत. सांडपाणी, पाणीपुरवठा, रस्ते अशा पद्धतीनं सगळीकडे सुधारणेची गरज आहे. त्याकरता पुढील ५ वर्ष लोकविकास महाआघाडीचा उमेदवार निवडून आणून देणं गरजेचं आहे, असं स्पष्ट केलं.
बीड जिल्ह्यातील लोकांना महानगरीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. १२ महिने पाणी, जलशुद्धीकरण प्रकल्प, नवीन STP, कचरा व्यवस्थापन, उत्तम आरोग्य सुविधा, आधुनिक प्रकल्प, रोजगाराच्या संधी आदी सर्व उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis