
रायगड, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवून देणाऱ्या ‘ब्ल्यू फ्लॅग पायलट’ दर्ज्यानंतर राज्य सरकारने किनारपट्टीच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कोकणातील पाच महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांच्या जागतिक स्तरावरील रूपांतरासाठी तब्बल २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात १ कोटी ४० लाखांची निधीवाटप प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यात रायगड जिल्ह्यातील नागाव आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना थेट लाभ मिळणार असून, स्थानिक विकास, रोजगार आणि पर्यटनाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.
डेन्मार्कस्थित फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन संस्थेकडून सुरक्षितता, पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता, पर्यावरण पोषण आणि पर्यटक सेवा या कठोर निकषांवर ‘ब्ल्यू फ्लॅग पायलट’ मानांकन दिले जाते. हे मानांकन मिळणे म्हणजे किनारा केवळ निसर्गदृष्ट्या सुंदर नसून पर्यटकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा असल्याचे प्रतीक. यामागे विस्तृत निकषांचा अभ्यास, काटेकोर तपासणी आणि योजनाबद्ध विकासाची आवश्यकता असते. राज्य सरकार या योजनेला पर्यटन क्षेत्रासाठी ‘गेम चेंजर’ मानत आहे.
या दर्जासाठी समुद्रकिनाऱ्यांवर आधुनिक शौचालये, कपडे बदलण्याच्या खोल्या, स्वच्छ पिण्याचे पाणी, सुरक्षित पार्किंग, पाळणाघरे, जीव रक्षक टॉवर, सौरऊर्जेवर चालणारे दिवे, कचराव्यवस्थापनाची दर्जेदार साधने, दिशादर्शक फलक, सुरक्षित पथदिवे, सुस्थितीत प्रवेशरस्ते आणि पर्यटकांसाठी तात्पुरत्या सुविधांची उभारणी अनिवार्य आहे. या सर्व सुविधा उभारण्यासाठीच राज्य मंत्रिमंडळाने २०२५-२६ प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत २० कोटींचा निधी मंजूर करून विकासाला हिरवा कंदील दिला आहे.
कामांच्या गुणवत्तेसाठी शासनाने विशेष निर्देश जारी केले आहेत. जागतिक निकष लक्षात घेऊन वास्तुविशारदांची नेमणूक, तज्ज्ञ कंत्राटदार आणि वेळेवर देखरेख यावर भर देण्यात येणार आहे. तीन वर्षांच्या आत सर्व कामे पूर्ण करणे बंधनकारक असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. काम सुरू झाल्यानंतर कोणतेही बदल न करता काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “श्रीवर्धनसह कोकणातील पाच किनाऱ्यांना मिळालेला ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जा हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.
या निधीतून जागतिक दर्जाच्या सुविधा उभारल्या जातील. यामुळे पर्यटन वाढेल, स्थानिकांना रोजगार मिळेल आणि किनारपट्टीचे आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईल.” या योजनेअंतर्गत रायगडमधील नागाव आणि श्रीवर्धन, रत्नागिरीतील गुहागर व लाडघर, तसेच पालघरमधील पर्णका या पाच किनाऱ्यांना प्रत्येकी ४ कोटी रुपये मंजूर असून, त्यातील १ कोटी ४० लाख रुपये प्रत्यक्ष वितरित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कोकणातील पर्यटनाला नवा आयाम मिळणार असून, समुद्रकिनाऱ्यांचा विकास ‘जागतिक दर्जा’ गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके