
बीड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये व्यापारी बांधवांचा मेळावा पार पडला.या मेळाव्याच्या निमित्तानं लोकविकास महाआघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती प्रेमलता दादासाहेब पारवे यांच्यासह अन्य तमाम उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करा, असं आवाहन केलं. श्रीमती प्रेमलताताई ह्या नायब तहसीलदार म्हणून काम केलेल्या, सुशिक्षित, अनुभवी आणि सर्व समाजाला न्याय देणाऱ्या आहेत, अशी खात्री मेळाव्याच्या निमित्तानं नागरिकांना दिली.
यावेळी अजित पवार म्हणाले,
बीड शहराच्या भविष्याचा निर्णायक टप्पा आपल्या दारात उभा आहे. या निवडणुकीत लोकविकास महाआघाडीनं ५३ उमेदवार उभे केले आहेत. हे अनुभवी आहेत, त्यांच्यात नवी उमेद आहे, ऊर्जा आहे. बीड शहर हे विविध जाती-धर्मांचं, विविध प्रवाहांचं शहर आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथल्या प्रत्येक माणसाला सन्मानानं जगता आलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे.
क्रीडा संकुलासाठी आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं जाणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि बारामतीमध्ये कचरा व्यवस्थापन, आधुनिक प्लांट्स, चांगले अधिकारी आम्ही उपलब्ध करून दिलेत. त्याच धर्तीवर बीडमध्ये देखील या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत, असं स्पष्ट केलं. विमानतळासाठीची जागा, सायन्स पार्क, दर्जेदार रस्ते ही सगळी कामं सुरू आहेत. बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवा आम्ही सुरू केली. आता या रेल्वे सेवेला पुण्यापर्यंत, त्यानंतर मुंबईपर्यंत न्यायचं आहे, यासंदर्भातील माहिती दिली.
बीडच्या ऐतिहासिक व धार्मिकतेचं प्रतीक असलेल्या कंकाळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. शहराचा कायापालट व्हावा म्हणून पुढची ५ वर्षे पूर्णपणे काम करण्याची संधी आम्हाला मिळणं गरजेचं आहे. हे शहर उभं राहताना कोणालाही वंचित ठेवायचं नाही. मग तो शेतकरी असो, व्यापारी असो किंवा सामान्य नागरिक असो. सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. अतिवृष्टी असो वा संकट, तत्काळ मदत आम्ही पोहोचवत आलो आहोत, अशा भावना मेळाव्याच्या निमित्तानं व्यक्त केल्या. बीडकरांना १२ महिने पाणी मिळावं, हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प, एसटीपी, कचरा व्यवस्थापन याबाबतीतील कामं वेगानं सुरू करणार असल्याचं सांगितलं.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis