
सोलापूर, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। होटगी येथे ५० एकरावर उभारले जाणारे आयटी पार्क देशातील तिसऱ्या क्रमांकाचे पार्क असणार आहे. पुढील १८ महिन्यांत प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर गतीने कार्यवाही सुरू आहे. जलसंपदा विभागाने जमीन दिल्यानंतर एमआयडीसीने तिच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. या आयटी पार्कमुळे दोन लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व्यक्त केला आहे.
होटगी परिसरातील ५० एकराचे सुरवातीला गॅझेट होऊन ताबा एमआयडीसीकडे देण्यात येईल. त्यानंतर आराखडा तयार होऊन प्लॉट पाडले जातील. त्यासाठी साधारणत: एक वर्ष लागेल, असे एमआयडीसीचे अधिकारी सांगतात. त्या जागेसाठी जलसंपदा विभागाने तीन कोटी २० लाखांचा मोबदला मागितला आहे. परंतु, ती जागा विनाशुल्क द्यायची, रेडीरेकनर दरानुसार की ५० टक्के दरात द्यायची, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा पाठपुरावा सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांचीही भूमिका यात निर्णायक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड