
परभणी, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। सेलू शहरातील दत्तनगर, पोलिस क्वार्टर रोड येथील दत्त मंदिरात दत्त, विठ्ठल व रूक्मिणी यांच्या नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सेलूत तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मूर्तींची मिरवणूक स्टेशन रोड, मोंढा, क्रांती चौक, गणपती गल्ली, मारवाडी गल्ली या प्रमुख मार्गांवरून जल्लोषात काढण्यात आली. ढोल-ताशे, टाळ-मृदंग, लेझीम पथक, पारंपरिक वेषभूषा आणि हरिनामाच्या गजरात भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मिरवणुकीनंतर मूर्ती विधीवत मंदिरात दाखल करण्यात आल्या. या मिरवणूकीत मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या पुढील दोन दिवसांत पूजा-अर्चना आणि विविध धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानंतर हरीकिर्तनाचे आयोजन असून हभप प्रसाद महाराज काष्टे यांचे कीर्तन होणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी मूर्तीस्थापना विधी संपन्न होईल. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रम संयोजक कपिल पडूळ यांनी दिली. या धार्मिक सोहळ्याचा लाभ अधिकाधिक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis