
रत्नागिरी, 25 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे वाणिज्य व व्यवस्थापन, लेखशास्त्र, वित्त आणि अर्थशास्त्रावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन येत्या २९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे पीएम-उषा अंतर्गत ही एकदिवसीय बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. ऑफलाइन व ऑनलाइन अशा पद्धतीने ही परिषद होणार आहे. शनिवारी, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे परिषदेचा प्रारंभ होईल. रत्नागिरी एजुकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीतील प्रतिथयश उद्योजक दीपक गद्रे उपस्थित राहतील. पीएम उषा समन्वयक (महाराष्ट्र राज्य) उपस्थित राहतील. परिषदेमध्ये बीजभाषण देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक व वक्ते म्हणून मलेशिया येथील डॉ. अनबीया खैरील, भारतातील डॉ. केतन वीरा यांची उपस्थिती असेल.
ही परिषद संशोधक विद्यार्थी प्राध्यापक विविध क्षेत्रातील विद्वान तसेच उद्योजक व व्यावसायिकांना नावीन्यपूर्ण कल्पना आणि जागतिक दृष्टिकोनांची देवाणघेवाण करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. या परिषदेमध्ये जगातील विविध देश आणि भारतातील विविध राज्यांमधील संशोधक, विद्वान, उद्योजक व व्यावसायिक, प्राध्यापक व विद्यार्थी असे मिळून एकूण ३५० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होणार आहेत. एकूण ८० पेक्षा जास्त विविध विषयांवरील शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर हे या परिषदेचे निमंत्रक असून वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, डॉ. रूपेश सावंतदेसाई, डॉ. सीए. अजिंक्य पिलणकर हे सहनिमंत्रक आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी