
जळगाव, 25 नोव्हेंबर (हिं.स.) भुसावळ विभागात येणाऱ्या मध्य रेल्वेने मनमाड आणि जळगाव दरम्यानच्या अत्यंत व्यस्त असलेल्या १६० किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या रेल्वे मार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून या रेल्वे मार्गाची अंतिम चाचणी यशस्वी झाली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे मुंबई-हावडा मार्गावरील कोंडी संपणार असून प्रवासी गाड्यांची वेळेवर धावण्याची क्षमता मजबूत होईल. मनमाड-जळगाव दरम्यानच्या प्रकल्पातील पिंपरखेड-नांदगाव (१०.४ किमी) या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. या विभागाची पाहणी सेंट्रल सर्कलचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी केली.
सुरक्षा निरीक्षण आणि इलेक्ट्रिक लोकोच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वेग चाचणीत रेल्वेने ताशी १३१ किलोमीटरचा प्रभावी वेग गाठला. खरंतर मुंबई-हावडा रेल्वेच्या मुख्य मार्गावर दररोज गीतांजली एक्सप्रेस, हावडा मेल, कोलकाता मेल अशा सुपरफास्ट गाड्या धावतात. तर थेट धावणाऱ्या सुमारे १० ते १२ लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत. जळगाव ते मनमाड मार्गावरील गाड्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे अनेक वेळा गाड्यांचे वेळापत्रक कोलमडते. या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या दिशेने जळगाव-मनमाडदरम्यान १६० किलोमीटर अंतरात तिसऱ्या रेल्वे मार्गाचे नियोजन करण्यात आले होते. एकूण चार टप्प्यात हाती घेण्यात आलेल्या या मार्गात ३०४ लहान, २२ मोठे पूल उभारले गेले. हा प्रकल्प मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात, बऱ्याच अडचणींमुळे त्याची तांत्रिक व वेग चाचणी दीड वर्ष उशिराने झाली आहे. जळगाव-मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गात अत्याधुनिक सिग्नल प्रणाली आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. ११ आधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालींसोबतच १६ ब्लॉक विभागांमध्ये बीपीएस प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सात बाय १८.३ मीटरचे कंपोझिट गर्डर असलेला महत्त्वपूर्ण पूल तिसऱ्या मार्गाबरोबरच नियोजित चौथ्या मार्गासाठीही तयार ठेवण्यात आला आहे.जळगाव ते मनमाड हा रेल्वे मार्ग केवळ बांधकामाच्या टप्प्यापर्यंत मर्यादित न राहता रेल्वेच्या कार्यक्षमतेत मोठा आमूलाग्र बदल घडवून आणणारा ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर