
मंत्री गिरीश महाजनांच्या टीकेवर दिले प्रत्युत्तर
जळगाव, 25 नोव्हेंबर (हिं.स.)जामनेर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एका उमेदवाराला बळजबरी पकडून आणत असल्याची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर भाजपवर विरोधकांकडून सडकून होत आहे. शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनीही मंत्री महाजन टिकास्त्र सोडले होते. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री महाजन यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशीही मागणी आमदार पवार यांनी केली होती.यावर गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांना भुसावळमधील सभेत प्रत्युत्तर दिले. जनतेची कामे करत असल्याने आम्ही इतकी वर्षे निवडून येत आहोत. जनतेने उगाच नाही आम्हा पती-पत्नीला सात ते आठ वेळा निवडून दिले. आमदार रोहित पवार आजोबांच्या मांडीवर, कडेवर बसून पहिल्यांदा आमदार झाले होते.असा टोला महाजन यांनी रोहित पवारांना लगावला. यानंतर रोहित पवारांनी महाजन यांना ट्विट करत प्रत्युत्तर दिल आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, गिरीश महाजन साहेब, आपल्याला आपल्या कर्तृत्वावर एवढा विश्वास होता तर गुंडगिरी करून समोरच्या उमेदवारांना पकडून आणून बळजबरीने अर्ज मागे का घ्यायला लावले? विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढवण्याची हिम्मत का दाखवली नाही? एवढं मोठं मंत्रिपद असूनही आपण उत्तर महाराष्ट्र तर सोडा जळगावसाठी काय केलं, एकतरी उद्योग आणला का? जळगाव आपलं घर असताना आपलं सगळं चित्त फक्त नाशिककडंच का?आपल्या कार्यकाळात भकास असलेला विकास गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण मोटारसायकलवरून जात असतानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने बघितलाच आहे. आता मंत्रिपद आहे तर किमान आपल्या भागाला, आपल्या जिल्ह्याला तरी फायदा करून द्या…
--------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर