
रायगड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या वचननामा प्रकाशन कार्यक्रमात राज्याचे पर्यटन मंत्री उदय सामंत यांनी कर्जत मतदारसंघातील विकासकार्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी बजावलेल्या भूमिकेचे जोरदार कौतुक केले. कर्जत शहर आणि परिसरातील पायाभूत सुविधा उभारणीसाठी गेल्या काही वर्षांत तब्बल 119 कोटींच्या कामांना निधी मिळवून देण्याचे श्रेय थोरवे यांचे असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
सामंत पुढे म्हणाले, “कर्जतसाठी मिळालेल्या निधीची तुलना राज्यातील इतर नगरपरिषदांशी केली, तर अनेक मंत्र्यांनाही एवढा निधी मिळवून देता आला नाही. आमदार थोरवे यांनी खऱ्या अर्थाने विकासाचा आदर्श तयार केला आहे.” सामंत यांनी माथेरानमधील प्रलंबित प्रश्नांवरही भाष्य केले. ते म्हणाले, “थोरवे साहेब सतत पाठपुरावा करत होते. अनेक बैठका घेतल्या आणि अनेक विषय मार्गी लावले. आचारसंहिता संपताच काही मोठे निर्णय जाहीर होतील.” महायुतीच्या विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त करत सामंत म्हणाले, “नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजय मिळेल. कर्जत नगरपरिषद महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित करेल आणि कोकणभर विकासाचा संदेश जाईल.”
राज्य महायुती समन्वय समितीची माहिती देत त्यांनी सांगितले की, “माननीय बावनकुळे साहेब, रविंद्र चव्हाण साहेब, उदय सामंत, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ या सहा सदस्यांनी अनेक मतभेद सोडवले आहेत. किरकोळ मतभेद निवडणुकीनंतरही मार्गी लावू.” पर्यटन मंत्री म्हणून कर्जत–माथेरानच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका राहील, असे आश्वासन देत ते म्हणाले, “हे वर्ष महायुतीच्या विजयाचे ठरेल.
कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना–भाजपा–आरपीआय महायुतीचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षय लाड, सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कर्जतने आदर्श प्रस्थापित करून दाखवायचा आहे.” कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात भाषणाचे स्वागत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके