
पुणे, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) - संगमवाडी येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या नियोजित स्मारकाच्या कामाला गती द्या, स्मारकाचे काम वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्या, अशा सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी महापालिका प्रशासनाला केल्या.मिसाळ यांनी सोमवारी स्मारकाच्या कामाची पाहणी करून प्रकल्पाच्या विविध टप्प्यांची माहिती घेतली. या वेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, उपायुक्त संतोष वारुळे, उपायुक्त वंदना कोतुरे, भवन विभागाचे अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप, सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे आदी उपस्थित होते.
मिसाळ म्हणाल्या, ‘‘क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे हे सामाजिक समरसता, शौर्य व लोकजागृतीचे प्रतीक आहेत. त्यांच्या स्मारकाचे काम गुणवत्तापूर्ण असायला पाहिजे. स्मारकाच्या कामाला गती देऊन ते वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्या. ऑगस्ट महिन्यापर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा.’’या प्रकल्पात लहुजी वस्ताद साळवे यांचा ब्रॉंझमधील पुतळा, त्यांनी वापरलेले साहित्य, वस्तू आणि त्यांच्या छायाचित्रांचे संग्रहालय, कला दालनासाठी प्रदर्शन कक्ष, कुस्तीचा आखाडा व आधुनिक व्यायामशाळा असलेले शारीरिक प्रशिक्षण केंद्र, वाचनालय, डिजिटल ग्रंथालयाचा समावेश असलेले संशोधन विकास केंद्र, विद्यार्थी व विद्यार्थिनींना राहण्यासाठी वसतिगृह, तर बहुउद्देशीय इमारतीमध्ये ॲम्फी थिएटर, स्वतंत्र सभागृहाचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी दीडशे कोटी रुपये खर्च येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु